विजय कदम यांनी रंगभूमी गाजवलीच शिवाय सिनेसृष्टीमध्येही दमदार भूमिका साकारल्या. ‘चष्मेबद्दूर’, ‘ब्लफमास्टर’, ‘टोपी घाला रे’, ‘भेट तुझी माझी’, ‘देखणी बायको नाम्याची’ या चित्रपटांत त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या.
ACTOR VIJAY KADAM NO MORE : मालिका तसेच चित्रपटांतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज दीर्ध आजाराने निधन झाले़ ते 67 वर्षांचे होते. त्यांनी विविध मालिका, चित्रपट, नाटकांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
अभिनेते विजय कदम आजवर अनेक चित्रपट आणि नाटकांत कामे केली आहेत. टोपी घाला रे बच्चे सबसे अच्छे, मधुचंद्राची रात्र, देखणी बायको नाम्याची, तोचि एक समर्थ अशा अनेक मराठी चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या़ विजय कदम यांनी हळद रुसली कुंकू हसलंमध्ये अभिनेत्री अश्विनी भावेच्या पतीची भूमिका साकारली. सही दे सही, टूर टूर, पप्पा सांगा कुणाचे ही त्यांची नाटके देखील तुफान गाजली.
विजय कदम यांनी विविधरंगी भूमिका मराठी रंगभूमीवर साकारल्या. मराठी मालिकांमध्येही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. सध्याच्या नव्या कलावंतांसोबत काम करतानाही ज्येष्ठतेचा कुठलाही आव न आणता त्यांनी आपल्या भूमिकांना न्याय दिला. सही रे सही’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘पप्पा सांगा कुणाचे’ आणि ‘टूरटूर’ या नाटकांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका चांगल्याच लोकप्रिय ठरल्या. प्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत केलेले टुरटुर नाटकाने रसिकांना मनमुराद हसवले.
अभिनेते विजय कदम यांनी प्रेमविवाह केला असून, त्यांची पत्नी पद्मश्री जोशी सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. नणंद भावजय, पोरीची धमाल बापाची कमाल, नवलकथा या चित्रपटात पद्मश्री जोशींनी अभिनय साकारला आहे. विशेष म्हणजे विजय कदम आणि पद्मश्री जोशी यांनी नाटकांत एकत्रित कामे केली. विच्छा माझी पुरी करा, या नाटकातील विजय कदम यांनी साकारलेल्या भूमिकेमुळे पद्मश्री यांनी त्यांच्या प्रेमाला स्वीकार दिला.
सुधीर मुनगंटीवार
मराठी मालिका, आणि रंगभूमी, मराठी चित्रपट या सर्व क्षेत्रात आपल्या अभिनयाची छाप पाडणारे दिग्गज कलावंत म्हणून विजय कदम यांची ओळख होती. विशेषतः त्यांच्या विनोदी भूमिकांनी रसिकांना मनमुराद आनंद दिला. असा हा हरहुन्नरी कलाकार हरपला असल्याची, भावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त करत त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.