She Box for Women : कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी तसेच अशा घटनांवर देखरेख ठेवण्यासाठी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने शी बॉक्स अर्थात She-Box हे, नवे वेब पोर्टल सुरू केले आहे. संपूर्ण देशासाठी केंद्रीकृत पोर्टल म्हणून हे वेब पोर्टल कार्यरत राहील. आज नवी दिल्ली इथे या नव्या संकेतस्थळाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम झाला. यावेळी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी [ UNION MINISTER ANNAPURNA DEVI ] यांच्या हस्ते या संकेतस्थळाचा प्रारंभ झाला.
She Box नवे वेब पोर्टल देशभरातील सर्व शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापने आणि कार्यालयांमध्ये स्थापन केल्या गेलेल्या अंतर्गत समित्या (IC) आणि स्थानिक समित्यांशी (LC) संबंधित माहितीसाठाचे केंद्रीकृत भांडार म्हणून कार्यरत असेल. तक्रार दाखल करणे तसेच तक्रारीच्या स्थितीगतीविषयी माहिती मिळवण्यासाठी एकच व्यासपीठ म्हणून हे वेब पोर्टल उपयुक्त ठरणार आहे.
यासोबतच अंतर्गत समित्यांद्वारा कालबद्ध स्वरुपात प्रक्रिया पार पाडली जाईल, याची सुनिश्चिती करण्यातही या वेब पोर्टलची मदत होणार आहे. हे वेब पोर्टल प्रत्येक संबंधीताला तक्रारीचे निवारण होण्याची तसेच सुव्यवस्थित प्रक्रियेची हमी देते. हे पोर्टल समर्पित समन्वयक अधिकाऱ्याच्या माध्यमातून तक्रारींसंबधी प्रक्रियेवर देखरेख ठेवेल.
वेब पोर्टलमुळे देशभरातील सर्व महिलांसाठी कामाचे, सुरक्षित आणि सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्याप्रती सरकारची वचनबद्धताही अधिक दृढ झाली. या वेब पोर्टलवर दाखल झालेल्या तक्रारींसंबंधी तक्रारदाराचा कोणताही वैयक्तिक तपशील सार्वजनिक होणार नाही. त्यामुळे तक्रारदाराला सुरक्षीतपणे तक्रार दाखल करता येईल, याची सुनिश्चिती हे पोर्टल करेल असा विश्वास केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी व्यक्त केला.