NAGPUR BENCH ON GANESHOTSAV : येत्या ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून, पीओपी मूर्तींची स्थापना होऊ नये यासाठी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हमीपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिका आणि पोलिस प्रशासन यांची संयुक्त बैठक 29 आॅगस्ट रोजी घेण्यात आली. पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले उपस्थित होते. बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांद्वारे स्थापना करण्यात येणारी श्रीगणेशाची मूर्ती पूर्णत: मातीचीच आहे, याची खात्री देण्यासाठी श्री गणेशोत्सव मंडळांना हमीपत्र 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सादर करणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पीओपी ला नाही म्हणा : आयुक्त चौधरी
श्रीगणेशोत्सव आणि आनंद आणि चैतन्याचा सण आहे. या सणातून इतरांच्या चेहºयावर आनंद निर्माण व्हावा, हाच हेतू आहे. पीओपी अर्थात प्लॉस्टर आॅफ पॅरिस हे पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. यामुळे मानवासोबतच निसर्गातील इतर घटकांनाही हानी पोहोचू शकते. त्यामुळे हा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
आपल्या घरी, आपल्या मंडळाद्वारे स्थापन करण्यात येणारी श्रीगणेशाची मूर्ती मातीचीच असल्याची खात्री करूनच खरेदी करा. यासोबतच श्रीगणेशाची आरास करताना सजावटीमध्ये प्लॉस्टिक, थर्मोकॉल आणि इतर कृत्रिम साहित्यांचा वापर करू नये, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.