जाहिरातीच्या आभावी अनेकवेळा महिला बचत गटांची उत्पादने विकली जात नाहीत किंवा त्यांना योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यासाठी महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यशस्विनी ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म विकसित केला आहे.
मुंबई: महिला बचतगटांच्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून महिला बचतगटांसाठी ‘यशस्विनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म’ [ YASHASVINI E- COMMERCE PLATFORM ] हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते या प्लॅटफॉर्मचे आॅनलाईन उद्घाटन करण्यात आले.
आॅनलाईन शॉपिंग ही रिटेल क्षेत्रात महत्त्वाची भूमिका निभावत आहे. सध्या कोट्यवधी रुपयांची देवाण घेवाण याद्वारे केली जात आहे. यात महिला बचतगटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा पथदर्शी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यातील ग्रामीण, आदिवासी, शहरी अशा हजारो बचतगटांनी तयार केलेली नाविन्यपूर्ण, दर्जेदार उत्पादने यशस्विनी ई -कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असून, महिला बचत गटांना आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग उपलब्ध होणार आहे.
बचत गटांना खरेदी किंवा विक्री करण्याकरिता सहज आपले नाव नोंदणी करता येणार आहे. तसेच, उत्पादनाचे छायाचित्र अपलोड करता येणार आहेत तसेच त्यांच्या किंमतीची व गुणवत्तेची जाहिरात करण्यासाठी सुद्धा यामध्ये डॅशबोर्ड व्यवस्था केली आहे. बचतगटांना उत्पादन पॅकिंग, वाहतूक, साठवणूक करणे, योग्य हाताळणी करणे आदींविषयी माहिती दिली आहे. महिला बचतगटांनी उत्पादन केलेल्या वस्तूंची विक्री झाल्यानंतर त्यांच्या खात्यात आॅनलाईन रक्कम जमा होण्याची व्यवस्थाही आहे. यशस्विनी प्लॅटफार्म सर्व जनतेसाठी उपलब्ध असून, नागरिकांनी https://yashaswini.org/launch.html या प्लॅटफॉर्मला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.
TAPORI TURAKI कपाट उघडल्यावर महिलांसमोर दोन मुख्य अडचणी असतात…