#private coaching classess #nagpur collector
NAGPUR HEAT : सद्यःस्थितीत जिल्ह्यात अधिकत्तम तापमान 43 ते 46 सेलसियस असे जात असून उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताचा धोका निर्माण झालेला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, कामगार, शेतकरी तसेच विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 40 अंशापेक्षा तापमान जास्त राहणार असून, याकरीता आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
उष्मालाटेच्या कालावधीमध्ये अंग मेहनत करणाऱ्या कामगारांनी दुपारच्या सत्रात काम न करता सकाळी व सायंकाळच्या सत्रात काम करण्याची खबरदारी घेतली पाहिजे.
कामाच्या ठिकाणी उष्मघातापासून संरक्षणासाठी पुरेसे शेड, पंखे, कुलर किंवा तत्सम साधनांची व्यवस्था तसेच पिण्यासाठी पुरेसे पाणी व प्रथमोपचार पेटी याची जबाबदारी संबंधित मालकांनी घेतली पाहिजे. खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी त्यांचे क्लासेस सकाळ व सायंकाळच्या सत्रात घेण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय व आस्थापनांनी अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची व शेडची व्यवस्था कराव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.
उन्हाळयामध्ये नागरीकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता
काय करावे : तहान लागली नसली तरीही दर अर्धा तासाच्या फरकाने पाणी पिणे. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री, अथवा टोपी, व पांढरा शेला,दुपट्टाचा वापर करा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडीओ, टि.व्ही, किवा वर्तमान पत्रातील आवाहन लक्षात घ्या. हलके, पातळ व सच्छिद्र सुती, खादी, पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरगुती उपाय लिंबूपाणी, ताक, लस्सी, व्यावे. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम चक्कर येणे आदी उन्हाचा चटका बसण्याची चिन्ह ओळखा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे व त्यांना पुरेसे पाणी पिण्यास द्यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे शटर व सनशेडचा वापर करावा व रात्रीस खिडक्या उघड्या ठेवा. गरोदर स्त्रिया, लहान बालके, आजारी व वृद्ध व्यक्ती यांची अधिक काळजी घ्या.
टाळा : दुपारी 12 ते 3 वाजेदरम्यान घराबाहेर पडू नका, जाणे टाळा. दारु, चहा, कॉफी, आणि कार्बोनेट थंड पेय घेऊ नका, ऊन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करणे टाळा व स्वयंपाक घराचे दार खिडकी उघडी ठेवा. उच्च प्रथिनयुक्त व शिळे अन्न खाणे टाळा. लहानमुले अथवा पाळीव प्राणी यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका. गडद घट्ट व जाड कपडे घालणे टाळा. बाहेर तापमान जास्त असल्यास किंवा उन्हात कष्टाची शारीरिक श्रमाची काम करणे टाळा.