बर्नार्ड शॉ म्हणतात, कोणत्याही माणसाला आपण तो जसा दिसतो, तसे पाहतो. एखाद्या माणसाबद्दलचे आपले ‘फर्स्ट इम्प्रेशन’ वेगळेच असते. माणून आपल्याला जसजसा उलगडत जातो, तसे त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. दिसण्यापेक्षा असणे महत्त्वाचे मानले जाते. एखाद्या माणसाची देहबोली, कपडे, हावभाव यावरून आपण अनेक ठोकताळे बांधत असतो. मात्र, माणूस जसा दिसतो, तसा असेलच असे नाही. म्हणूनच माणूस समजून घेऊनच त्याबद्दलचे मत आपण बनवले पाहिजे.
दिग्गज साहित्यिक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनाही असाच अनुभव आला. नेमके काय घडले, त्यावर शॉ यांनी कोणते भाष्य केले, याबद्दल जाणणे गरजेचे आहे.
दिग्गज साहित्यिक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांना एका महिलेने आग्रह करून रात्रीच्या जेवणासाठी स्वगृही आमंत्रित केले. बर्नार्ड शॉ त्यावेळी कामामध्ये अत्यंत व्यस्त होते. मात्र, तरीही त्यांनी त्या महिलेचे निमंत्रण स्वीकारले. ज्या दिवशी शॉ यांना महिलेच्या घरी जेवणासाठी जायचे होते, त्या दिवशी तर ते थोडे जास्तच व्यस्त होते. कसेबसे काम आटोपून शॉ त्या महिलेच्या घरी पोहोचले. प्रत्यक्ष जॉर्ज बर्नार्ड शॉ यांना दारात पाहून महिलेला खूप आनंद झाला. मात्र, दुसºया क्षणी तिच्या चेहºयावर निराशा उमटली. कारण असे, की कामाच्या गडबडीमुळे नेसत्या वस्त्रानिशी शॉ त्या महिलेच्या घरी पोहोचले होते. या कारणावरून ती महिला खूप निराश झाली आणि कपडे बदलून येण्यासाठी शॉ यांच्याकडे जवळजवळ हट्ट करू लागली. शॉ यांनी महिलेला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, काही केल्या ती महिला ऐकायला तयार नव्हती.
‘‘तुम्ही तातडीने मोटारगाडीत बसून घरी जा आणि चांगले कपडे परिधान करून या’’, असे त्या महिलेने शॉ यांना फर्मावले. आता कोणताही पर्याय नसल्याने शॉ तिथून निघून गेले. काही मिनिटांनंतर शॉ पुन्हा तिच्या घरी दाखल झाले़ तेव्हा त्यांनी सर्वांत महागडे कपडे घातले होते. काही वेळानंतर उपस्थित पाहुण्यांनी पाहिले, की शॉ आईस्क्रीम आणि अन्य खाद्यपदार्थ आपल्या कपड्यांवर पसरवत आहेत. हे पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले. ‘खा… खा… कपड्यांनो, तुम्हीच हे सर्व अन्न खा. कारण तुम्हालाच जेवणाचे निमंत्रण मिळाले आहे. त्यामुळे हे सर्व जेवण आता तुम्हीच संपवा’, असा सूर शॉ यांनी लावला. हे आपण काय करीत आहात, असा प्रश्न उपस्थित पाहुण्यांनी शॉ यांना विचारला. मित्रांनो, जे मला करायचे आहे, तेच तर मी करतोय. कारण आजचे भोजनाचे निमंत्रण मला नसून कपड्यांना देण्यात आले आहे. म्हणूनच त्यांना भरवतोय, असे प्रत्युत्तर बर्नार्ड शॉ यांनी दिले.
यावर एकदम शांतता पसरली. यजमान महिलेची मान शरमेने खाली गेली. तिला स्वत:चीच लाज वाटायला लागली होती. शॉ यांनी अप्रत्यक्षपणे तिला मोठा धडा दिला होता. कोणत्याही व्यक्तीची पारख ही तिच्या कपड्यांवरून करू नये. माणूस दिसण्यापेक्षा तो कसा आहे, याला महत्त्व दिले पाहिजे, असेच या घटनेवरून शॉ यांनी सर्वांना पटवून दिले.