DEEPAVALI l November 1, 2024
देशभरात दिवाळीचा सण आनंद आणि उत्साहात साजरा केला जात आहे. आज लक्ष्मीपूजनानिमित्त घरोघरी पणत्या लावून आकाशकंदिल लावून आणि रोषणाई करून प्रकाशाचा हा सण साजरा करण्यात आला़
दीपावलीच्या पहिल्या दिवसापासून अभ्यंगस्नान करून या सणाचा आनंद लुटण्यात येतो़ दिवाळी पहाटेनिमित्त ठिकठिकाणी संगीत, नृत्य आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठिकठिकाणी रांगोळ्यांनी अंगणं, आवारे, आणि रस्ते सजले आहेत.
घरोघरी विविध आकारांचे आकाशकंदिल आणि विजेच्या दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. मुंबई,नागपूर,पुणे, नाशिक यासारख्या महानगरासह लहान मोठ्या शहरात जागतिक वारसा सांगणाºया इमारतींवर दिवाळीनिमित्त विविध रंगी दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती,पंतप्रधानांतर्फे शुभेच्छा
दिवाळीनिमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.
दिवाळीचा सण हा आनंद आणि उत्साहाचा सण असून, तो अज्ञानावर ज्ञानाच्या आणि वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटले आहे.
हा सण म्हणजे गरीब आणि गरजूंना मदत करण्याची आणि आपला आनंद त्यांच्याबरोबर वाटून घेण्याचीही संधी असल्याचे आपल्या संदेशात नमूद केले आहे. नागरिकांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी आणि आरोग्यदायी, संपन्न आणि जबाबदार समाज घडवण्याची शपथ घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दिवाळीचा सण केवळ भारतच नव्हे, तर जगभरात वास्तव्यास असलेल्या भारतीयांकडून आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो, असे उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे. दिवाळीच्या सणाच्या प्रकाशाने देशाला एकात्मता, संपन्नता आणि अमर्यादित प्रगतीचा मार्ग दाखवावा, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही समाजमाध्यमांवरून शुभेच्छा दिल्या आहेत. प्रकाशाच्या या सणाच्या निमित्ताने सगळ्यांना आरोग्यदायी, आनंदी आणि संपन्न आयुष्य लाभावे, असे असे त्यांनी म्हटले आहे.
विदेशांमध्येही दिवाळी उत्साहात
जगभरात अनेक देशांमधे दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत आहे. अमेरिका, इंग्लंडसह संयुक्त अरब अमिरातीमध्येही दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून, भारतीय उत्सवाने देशभरातील सर्व समुदायांना सामावून घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
आखातातील दुबईमध्ये दिवाळीचा उत्साह दिसत आहे. पारंपरिक वस्तूंच्या खरेदी बरोबरच सोन्याच्या बाजारातही लक्षणीय गर्दी दिसून आली. अबूधाबी येथील मंदिरांमध्ये विशेष प्रार्थना आयोजित करण्यात आली असून दिवाळीनिमित्त संपूर्ण अमिरातीमध्ये सामुदायिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सेवाभावी उपक्रम होत असल्याचे वृत्तसंस्थांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे.