KRUSHNA KHOPADE BJP l November 1, 2024
पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे [ KRUSHNA KHOPADE ] यांच्यावर भारतीय जनता पार्टी नेतृत्वाने पुन्हा चौथ्यांदा विश्वास दाखवला आहे. विजयाच्या हॅट्ट्रिकनंतर आता ते ‘विजय चौकार बाण’ खेचण्यासाठी सज्ज आहेत़ त्यांची मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार दुनेश्वर पेठे यांच्यासोबत होणार असल्याचे मानले जात आहे.
साधा माणूस आणि सहज उपलब्ध होणारा आमदार अशी खोपडे यांची ओळख आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते तसेच तत्कालीन पालकमंत्री सतीश चतुर्वेदी यांना पराभवाचा जोरदार धक्का देत त्यांनी विधानसभा गाठली होती. विधानभवनात प्रथमच पाय ठेवताच काँग्रेसचे नेते सतीश बाबूंचा पराभव करणारे खोपडे यांना भेटायला आले होते, अशीही आठवण सांगण्यात येते.
सन २००४, २००९ आणि २०१४ मध्ये विजयाची हॅट्ट्रिक नोंदवणारे आमदार कृष्णा खोपडे यांनी आपल्या मतदारसंघात विविध विकासकामे करवून घेतली आहेत.
कच्चे ठरले विरोधक
तीन वेळा पूर्व नागपूरची आमदारकी राखणारे कृष्णा खोपडे यांच्या विरोधात ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी यांच्यासह काँग्रेसच्या वतीने अभिजित वंजारी आणि पुरुषोत्तम हजारे निवडणूक लढले आहेत.
यंदा येथील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे असून, तीन वेळा काँग्रेस पराभूत झाल्याने ‘शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस’ने ‘पूर्व नागपूर’ ची मागणी केली़ आम्ही फक्त सतरंज्या उचलायच्या का, अशी संतप्त विचारणा अनेकदा करण्यात आली होती़ यानंतर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे [ DUNESHVAR PETHE NCP-SP ] यांना संधी देण्यात आली़ प्रदेश सचिव शेखर सावरबांधे यांचेही नावे राष्ट्रवादीकडून चर्चेत आले होते़
तिहेरी लढत
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आभा पांडे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे़ त्यामुळे पूर्व नागपुरात तिहेरी लढत होणार असल्याचेही मानले जात आहे.