हिंगणा मतदारसंघात वाढली इच्छुकांची भाऊगर्दी हिंगणा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून म्हणजेच १५ वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात आहे. विजय घोडमारे यांनी पाच वर्षे तर समीर मेघे यांनी सलग १० वर्षे हिंगणा विधानसभेचे नेतृत्व केले. विद्यमान आमदार समीर मेघे सलग दोन वेळा निवडून आल्यामुळे आता त्यांना ‘हॅट्ट्रीक’ करण्याची संधी आहे. मात्र, महाविकास आघाडी त्यांना ‘हॅट्ट्रीक’ चा आनंद देते की नाही, हे येणारा काळच ठरवेल.
HINGANA VIDHANSABHA CONTITUENCY २००९ मध्ये तत्कालीन भाजपा उमेदवार विजय घोडमारे पाटील यांनी राष्ट्रवादीचे रमेशचंद्र बंग यांचा पराभव केला होता. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाचेच समीर मेघे यांनी हिंगणा काबीज केले. या मतदारसंघात समीर मेघे यांनी विकासाची कामे केली; परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांनी सुमारे १७ हजारांवर मतांची आघाडी घेतल्याने महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा ) मधील इच्छुकांची नावे समोर आली आहेत. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान विरोधी पक्षांनी संविधानाच्या मुद्याला हात घातल्यामुळे ही मते वाढल्याचा दावा करण्यात येतो.
तुल्यबळ कोण?
भाजपाचे उमेदवार समीर मेघे कायम असेल, हे सुर्यप्रकाशाइतके सत्य असल्याचे मानले जाते़ त्यांना तुल्यबळ उमेदवार शोधण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नरत आहे. अशातच रमेशचंद्र बंग यंदाची विधानसभा लढण्याची शक्यता धूसर आहे. त्यांच्या कुटुंबातील दिनेश बंग अथवा संतोष नरवाडे की उज्ज्वला बोढारे, असे सर्व गणित माजी मंत्री बंग यांच्यावर अवलंबून आहे.
ठाकरे गटही जोरात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हिंगणा विधानसभा देण्याची तयारी असल्याची चर्चा आहे. शिवसेना युवासेना राष्ट्रीय कार्यकारी सदस्य हर्षल काकडे यांचेही नाव हिंगणा मतदार संघाच्या उमेदवारासाठी महाविकास आघाडीकडून अंतिम होण्याचे नाकारता येत नाही.
हर्षल काकडे यांचे महाविकास आघाडीतील प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत असलेले चांगले संबंध, हीच त्यांची जमेची बाजू आहे. हिंगणा तालुका प्रमुख विष्णू कोल्हे, माजी पंचायत समिती उपसभापती विलास भोंबले हे सुद्धा इच्छुक उमेदवार म्हणून समोर आले आहेत.
काँग्रेसही मागे नाही
यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाचा उत्साह शिगेवर आहे. पक्षातर्फे सुनील केदार हेच संधी देवू शकतात, हेही तितकेच खरे़ सुनील केदार यांचे ग्रामीण भागात वर्चस्व आहे. जि.प. उपाध्यक्षा कुंदा राऊत, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अश्विन बैस यांच्याही नावाची चर्चा रंगली आहे. अश्विन बैस मागील अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. वाडीतील शासकीय दवाखाना मंजूर करून घेण्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. दुसरीकडे कुंदा राऊत यांनी २०१४ मध्ये निवडणूक लढवली होती.
उमेदवारांत महिलाराज
हिंगणा विधानसभा निवडणुकीतील विविध राजकीय पक्षाच्या संभाव्य उमेदवारांत ‘महिलाराज’ सातत्याने दिसून येत आहे. संध्या गोतमारे, उज्ज्वला बोढारे, कुंदा राऊत, अश्विनी कन्हेरकर ही नावे समोर आहेत. प्रतीक्षा आता पुढील दिवसांची आहे, हे नक्की.