MAHARASHTRA VIDHANSABHA ELECTION 2024 l October 22, 2024
विदर्भातील तापमान जगजाहीर आहे़ शिवाय राज्यातील सरकार बनविण्यात विदर्भच अग्रेसर असतो़ मात्र,यंदा निवडणुकीच्या आधीच विदर्भ ‘हॉट अँड हिट’ ठरला आहे़ येथील तब्बल १२ जागांवर मोठे काथ्याकुट सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणूक मोठी चुरशीची ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपाने मागील रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असली तरी महाविकास आघाडीकडून आजही या संदर्भात काही ठोस होण्याची चिन्हे दिसून येत नाही. दरम्यान, पक्षबदल, नाराजी, बंडखोरी प्रकर्षाने समोर आली आहे़ राज्यातील सध्याच्या राजकीय समीकरणाचा विधानसभा निवडणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता राजकीय समीक्षक व्यक्त करत आहेत़ सत्तेतील महायुती आणि विरोधक महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत दिसून येईल, यात शंका नाही.
अर्जांना सुरुवात
राज्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात झाली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे जागावाटप अजून स्पष्ट झालेले नाही. महायुतीत भाजपाचे ९९ उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही उमेदवार वगळता इतर उमेदवार जाहीर झालेले नाहीत.
मतभेद नाहीच
महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलेआहे. जागा वाटपासंदर्भात काँग्रेसच्या ९६ जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून, उर्वरित जागांवर घटकपक्षांसोबत चर्चांचा क्रम सुरू आहे़ यानंतर आजच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असे सांगत असतानाच त्यांनी महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बाहेर पडणार, या बातमीत काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.
अशातच विदर्भातील काँग्रेस नेते दिल्लीत ठाण मांडून बसले असल्याची माहिती समोर आली आहे़ ठाकरे गटही आपल्या मतावर ठाम आहे. दोघेही अडून बसल्याचे चित्र सध्या दिसत असून, यांच्यातील वाद दिल्ली दरबारात कधीच पोहोचला़ त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही़
… तर सहाही
ठाकरे गटाने दावा केलेल्या १२ जागांपैकी एकही जागा काँग्रेस सोडायला तयार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भातील जागा सोडू नये यासाठी अनेक नेते दिल्लीकडे मागणी करणार असल्याचे सांगण्यात येते़ असे असले तरी नागपुरातील सर्व सहा जागा काँगे्रसच्या ताब्यात राहण्याचीही शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, ‘दक्षिण नागपूर’ ही पारंपरिक जागा आमच्याकडेच राहावी, अशी भावना काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांनी व्यक्त केली आहे.