WADI FLYOVER NAGPUR l October 5, 2024
नागपुरात आणखी एक उड्डाणपुल तयार झाला असून, याद्वारे अमरावती मार्गावरील वाहतूक समस्या सुटणार आहे़
नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग 53 वरील वाडी येथील चार पदरी उड्डाणपुलाचे बांधकामामुळे नागपूरच्या व्हेरायटी चौकातून नागपूर शहराबाहेर जाण्यास केवळ 15 मिनिटे लागणार आहे़ या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होणार आहे, असे प्रतिपादन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.
नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील चार पदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण आज शनिवारी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले़ यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार समीर मेघे, भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
खर्च आणि वेळ असा …
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे सुमारे 246 कोटी रुपयांच्या तरतुदीने 2.3 किलोमीटर बांधलेल्या उड्डाणपुलामुळे विद्यापीठ कॅम्पस चौक ते वाडी पोलिस ठाणे यातील प्रवासाचा वेळ 25 मिनिटांवरून 8 मिनिटांवर येणार आहे़ यामुळे वाडी परिसरातील वाहतुकीची वर्दळ कमी होणार आहे.
याच कार्यक्रमात नागपूर अमरावती मार्गावरील व्हरायटी चौक ते बोले पेट्रोलपंप चौक आणि विद्यापीठ परिसर चौक ते वाडीपर्यंत रस्त्याचे 4.89 किमीचे व्हाईट टॉपिंग सीमेंट काँक्रिट रस्ते बांधकामाचे देखील लोकार्पण झाले. या दोन्ही प्रकल्पाची एकूण किंमत 323 कोटी आहे.