आठ मतदारसंघात १ कोटी ४९ लाख मतदार, १६ हजार ५८९ मतदान केंद्र
LOKSABHA ELECTION 2024 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसºया टप्प्यातील आठ मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात २९९ उमेदवारांचे अर्ज पात्र असून त्यातील काही उमेदवारांनी माघार घेतल्याने २०४ उमेदवार निवडणूक लढवण्यास पात्र ठरले आहेत़ मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली.
मंत्रालयातील पत्रकार कक्षात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, अवर सचिव तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्र्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये १९ एप्रिल तर दुसºया टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या आठ मतदारसंघामध्ये २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. दुसºया टप्प्यातील नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक ४ एप्रिल होता.
दुसºया टप्प्यात यवतमाळ-वाशिम, अमरावती, बुलडाणा, अकोला, नांदेड,हिंगोली,परभणी या आठ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय एकूण आठ जनरल निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलिस निरीक्षक एकूण पाच आणि खर्च निरीक्षक एकूण ११ याप्रमाणे नियुक्त करण्यात आले आहे.
दुसºया टप्प्यातील आठ लोकसभा मतदारसंघातील मतदारांची यादी ४ एप्रिल रोजी अद्ययावत करण्यात आलेली आहे़ दरम्यान, संबंधित आठ मतदारसंघांपैकी परभणीमध्ये सर्वांत जास्त अर्थात २१ लाख २३ हजार ५६ मतदारांची नोंद (मतदान केंद्रे २ हजार २९० इतकी) आहे़ तर, सर्वांत कमी मतदारांची नोंद वर्धा मतदारसंघात झालेली आहे़(मतदान केंद्रे १ हजार ९९७ इतकी)
भारत निवडणूक आयोगाने ४० टक्के दिव्यांगत्व असलेले दिव्यांग व ८५ वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांमधील इच्छुक मतदारांना १२-डी अर्जान्वये गृह मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार या टप्प्यातील आठ लोकसभा मतदारसंघात ६ एप्रिलपर्यंत ८५ वर्षे वयावरील १० हजार ६७२ ज्येष्ठ नागरिकांचे तर ४० टक्के दिव्यांगत्व असलेले ३ हजार ५५५ दिव्यांग मतदारांचे, तसेच अत्यावश्यक सेवा या श्रेणीत ३८५ असे १४ हजार ६१२ अर्ज गृह मतदानासाठी प्राप्त झाले आहेत.